पुणे : पुणे जिल्हा विजेतेपदासाठी आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत झुबेर शेख हा 'पुणे श्री 2017' किताबाचा मानकरी ठरला. पुण्याच्या बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस असोसिएशनच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत साऱ्या जिल्ह्यातून शंभरहून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घोतला होता. त्यापैकी 80 किलोवरील वजनी गटात झुबेर शेख जिल्हा विजेता ठरला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत झुबेरच्या पीळदार शरीरयष्टीसमोर इतर शरीरसौष्ठवपटूंचा निभाव लागला नाही. बॉडी बिल्डिंग अ‍ॅन्ड फिजिक स्पोर्टस् असोसिएशन पुणेतर्फे आयोजित अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा झाल्या. संपूर्ण जिल्हयातून 100 पेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

अन्य वजनी गटांमध्ये संदीप तिवडे, हर्षद काटे, अक्षय पवार, मनीष ससाणे, हृषिकेश पासलकर आणि महेश जाधवनं जिल्हा विजेतेपदाचा मान मिळवला. या विजेत्यांमध्ये 'पुणे श्री 2017' किताबासाठी झालेल्या स्पर्धेत पुन्हा झुबेर शेखनं बाजी मारली.

कर्वेनगर येथील दुधाणे लॉन्स येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे यंदा तीसरे वर्ष होते. यावेळी राजेश वाईकर यांना उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून गौरविण्यात आले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मिस्टर वर्ल्ड आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता संग्राम चौगुले व सुहास खामकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र चव्हाण, नीलेश बोंबले, कविता नंदी, नगरसेवक दीपक पोटे, महेश लडकत, सचिन दोडके, विजय दुधाणे आदी उपस्थित होते. संतोष कदम यांना गणपतराव बराटे स्मरणार्थ जिद्द पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप होते.