पुणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांनी तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून अजित पवारांनी विक्रमी मतांनी बाजी मारली. त्यानंतर युगेंद्र पवारांनी मतमोजणी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता अचानक बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतदान यंत्रांच्या तपासणीतून माघार घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्यावतीने मतदान यंत्राविरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर युगेंद्र पवार यांनी अचानकपणे फेर मतमोजणीच्या प्रक्रियेतून माघार घेतल्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. युगेंद्र पवारांनी याबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केला आहे.
मविआच्या अकरा पराभूत उमेदवारांनी केलेला अर्ज
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केला होते. यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचे 8 व काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांचाही समावेश होता. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. अजित पवारांना 1,96,640 तर युगेंद्र पवारांना 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.
निकालानंतर केला होता युगेंद्र पवारांनी अर्ज
मतमोजणीसाठी अर्ज करताना संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी केली जाते. या मतदान केंद्रातील यंत्राची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 42 हजार 500 रुपये अधिक 19 टक्के जीएसटी आकारून एकूण 47 हजार 200 रुपये आकारले आहेत. त्यानुसार या उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले होते.
मतमोजणी वेळी एखाद्या उमेदवाराने दोन तासांच्या आत आक्षेप घेतल्यास फेरमतमोजणी घेण्यात येते. त्यानंतर आक्षेप आल्यास व उमेदवार न्यायालयात गेल्यास फेर मतमोजणी घेण्यात येते. त्यासाठी सर्व मतदान यंत्रांमधील मतांची माहिती 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवली जाते. हा कालावधी येत्या 6 जानेवारीला संपत आहे. मात्र, आता अचानकपणे बारामती विधानसभा मतदासंघातील शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी फेरमतमोजणी प्रक्रियेतूनच माघार घेतली असल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे एकीकडे देशभर ईव्हीएम विरोधात वातावरण तापलं असताना युगेंद्र पवार यांची माघार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दहा ते बारा दिवसांपूर्वी मत पडताळणीचा अर्ज युगेंद्र पवारांनी माघारी घेतला.