पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर त्यांचेच सहकारी असणाऱ्या खेड-राजगुरुनगरच्या प्रांताधिकाऱ्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेत. राजकीय प्रभावातून दिवसे काम करत असून, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही पारदर्शकपणे पार पडणार नाही., अशी तक्रार करत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी दिवसेंची चार जून पूर्वी बदली करावी. अशी मागणी थेट निवडणूक आयोगाकडे केलीये. सोबतच अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंचं दबाव असल्याचं ही तक्रारीत नमूद केलंय.


कधी पुण्याचे कृषी आयुक्त, कधी क्रीडा आयुक्त, कधी पुणे पीएमएमआरडीएचे संचालक तर कधी पुणे जिल्हाधिकारी वर्षानुवर्षे सुहास दिवसे हे पुणे आणि परिसरात वेगवेगळ्या पदांवर काम करतायेत. याला राजकीय वरदहस्त कारणीभूत असल्याची चर्चा नेहमीचं होत होती. आता या चर्चेला आणखी बळ दिलंय, ते त्यांचे सहकारी असणारे खेड-राजगुरूनगरचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी.


जोगेंद्र कट्यारे यांनी सुहास दिवसेंवर अतिशय गंभीर आरोप केलेत. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना २८ मे रोजी त्यांनीं खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌  सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे.‌  सुहास दिवसे हे निवडणूकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिलाय.आगामी विधानसभा निवडणुकीचा निकाल स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे, असं कट्यारेंनी म्हटलं आहे. 



सुहास दिवसे सध्या पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभांचे मुख्याधिकारी ही आहेत. मात्र दिवसे या निवडणुकीची मतमोजणी पारदर्शकपणे पार पाडणार नाहीत. असा आरोप कट्यारेंनी तक्रारीत केलाय. त्यामुळं निवडणूक आयोग याबाबत काही कारवाई करतं का? हे पहावं लागणार आहे. दिवसेंसोबतच अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंवर ही कट्यारेंनी गंभीर आरोप केलेत. मोहितेंनी मात्र या प्रकरणाची चौकशी करण्याची थेट सरकारकडे मागणी केलीये. 
 पुणे, बारामती, शिररु आणि मावळ लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना झुकतं माप दिलं, असा आरोप करणाऱ्या विरोधकांना प्रांताधिकाऱ्यांच्या तक्रारीने आयतं कोलीतचं हातात दिलं.