..म्हणून अनेकांची जन्मतारीख 1 जून!
पूर्वी अनेकांना आपली जन्मतारीख माहित नव्हती. शिवाय जन्मतारखेला फारसं महत्त्व नसलेला तो काळ होता. इतकंच काय पण शाळेत नाव नोंदवताना जन्मतारखेची फारशी आवश्यकता नव्हती. मात्र शाळेत घालण्यासाठी वयाची अट पूर्ण करावी लागायची.
ही अट पूर्ण करण्याचा कालावधी जूनपासून मोजला जात असे. त्यामुळे सोयीचे म्हणून बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून नोंदवत असत. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असते.
एकाच दिवशी गावातील एवढ्या मुलांचा जन्म कसा झाला, असे प्रश्नही त्यावेळी फारसे कोणाला पडत नसावा. पण या जन्मतारखेमुळे आज एकाच दिवशी अनेकांचे वाढदिवस साजरे होतात. इंदापूरमध्ये तर आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापासून अनेकांचे आज वाढदिवस साजरे होत आहेत.
इंदापूरमध्ये आमदारापासून सामान्यांपर्यंत आज बर्थ डे
इंदापूरमध्ये युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने रोज वाढदिवस साजरे करण्यात येतात. पण 1 जूनमुळे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना अनेकांचे वाढदिवस साजरे करण्याचा योग येतो. इतर वेळी शहरातून आठ ते दहा वाढदिवसासाठी केक खरेदी होतात. मात्र 1 जून म्हटलं की या दुकान मालक शेकडो केक बनवतात आणि त्यांची विक्रीही होते.
जुन्या पिढीतील कित्येक लोकांची ऑन रेकॉर्ड जन्मतारीख म्हणजे एक जून. यादिवशी वाढदिवस असणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे हा दिवस जणू ‘वाढदिवस डे’ठरत आहे.