मुंबई : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील.
राज्यावर कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.
मुख्यमंत्री आज सकाळी नऊ वाजता पुणे दौऱ्याला निघतील. कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत कोरोनाविषयक बैठकाही घेणार आहेत.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 12.15 वाजता त्यांची कोरोना साथीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीसमवेत बैठक होईल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता त्यांची याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल. या बैठकांना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, मुख्य सचिव संजय कुमार तसंच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. मग संध्याकाळी पाच वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.
सरकारकडून पुण्यावर अन्याय : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. "हे सरकार मुंबईकडे जितकं लक्ष देतं तितकं पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वॉरन्टाईन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. पण पुणे, पिंपरी महापालिकेला एकाही नव्या पैशांचं अनुदान राज्य सरकारने दिलेलं नाही," असं फडणवीस म्हणाले होते.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 75 हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. तरीही मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा राजकीय दृष्टीकोनातूनही लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता आहे.