पुणे : पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाच्या परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे.

कालवा फुटण्यामागे कारण काय?

पर्वती भागातील मुठा कालव्याची भिंत फुटण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं, तरी स्थानिक नागरिकांनी काही कारणं सांगितली आहेत. अनेक नागरिकांनी संबंधित प्रशासनावर संताप व्यक्त करत, कालव्याच्या भिंतीला धोका असल्याचे माहिती असूनही दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही प्रशासनावर केलाय.

पर्वती परिसरातील कालव्याला धोका आहे, कालव्याची भिंत फुटू शकते, यासंदर्भातील माहिती इथले स्थानिक नागरिक वेळोवेळी प्रशासनाला देत होते. मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे गांभिर्याने पाहिलं जात नव्हतं.

कालव्याची भिंत ज्या ठिकाणी फुटली आहे, त्या ठिकाणी केबलचं काम सुद्धा चालू होतं. हे काम त्या दुर्घटनेला कारणीभूत ठरलं का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

PHOTO : कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर

मुठा कालव्याची भिंत फुटलेल्या ठिकाणी खड्डा होता. त्या खड्ड्यात लाकडाचा ओंडका टाकून खड्डा बुजवण्यात आला होता. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकाने आरोप केला आहे.

या कालव्याला धोका आहे, हे आधीपासूनच माहित असतानाही प्रशासनाने दखल घेतली नाही, असा आरोप होत आहे. कालव्याची देखभाल करण्याची जबाबदारी जलसंपदा विभाग आणि महापालिकेची असते.

नेमकी दुर्घटना काय?

पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर येत आहे. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं.

या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभऱ पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.

दरम्यान, डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की, त्या पाण्यात उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो.

जनता वसाहतीमध्ये बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.

VIDEO : मुठा कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर