पुणे : आफ्रिकेतून येणारे कोरडे वारे आपल्या बाष्पयुक्त हवेमध्ये मिसळतात त्यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. परंतु जून आणि जुलैमध्ये पावसात खंड होईल हे भाकित वर्तवलं होतं, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं. लोकांना सावध करावे या अनुषंगाने जिथे 65 मिलिमीटर पाऊस होईल किंवा त्यापेक्षा जास्त होईल तिथे वापसा येताच पेरण्या कराव्यात आणि पाऊस कमी झाला असेल किंवा 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला असेल आणि जमिनीत ओलावा नसेल तर पेरणी करू नये ही बाब आधीच सांगितली गेली होतीस, असं साबळे यांनी सांगितलं. मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये माझ्याकडे जवळ जवळ 16 वेधशाळेचा डेटा येतो. विदर्भातल्या चार मराठवाड्यातील एक त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील या सहा ते सात आणि कोकण कृषी विद्यापीठाची एक अशा या सगळ्यांच्या अभ्यासावरून मला असे दिसून आले यावर्षी साधारणपणे वाऱ्याचा वेग मार्च, एप्रिल, मे महिन्यात दोन ते अडीच किलोमीटर प्रति तास होता. ज्या वेळेला आठ ते नऊ किलोमीटर प्रतितास वेळ असायला पाहिजे होता, त्यावेळी दोन ते तीन किलोमीटर प्रतितास वेळ झाला. तरीही निश्चित माझ्या मॉडेलनुसार सांगता येईल की हमखास जूनमध्ये आणि जुलैमध्ये पावसात खंड होता, हे सांगितले होते. ज्यावेळी याला दुजोरा देणारी आणखी एक दुसरी भारतातील घटना घडली ते म्हणजे यावर्षीचे तापमान मार्च, एप्रिलमध्ये पाहिलं तर दोन अंश सेल्सिअसने तापमान सरासरीपेक्षा कमी होते व सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होता. हे तीन घटक इतके मार्मिक आहेत की या घटकांवरून सांगता येतं की हे घडणार होतं, असं रामचंद्र साबळे यांनी सांगितल.  सद्यस्थितीत महाराष्ट्रावर कमी दाबाचा हवेचे क्षेत्रे निर्माण होत आहे आणि त्यानुसार पावसाला सुरुवात होत आहे. कोकणामध्ये आजपासून तर मराठवाड्यामध्ये 10 तारखेपासून आणि मध्य महाराष्ट्रात 11 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल. साधारणपणे 13 जुलैला आणखी हवेचे दाब कमी आहेत त्यामुळे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीची संभावना आहे, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

कोकणामध्ये सध्या भात लागवड थांबलेली आहे. तसेच मराठवाड्यात जेव्हा चांगला पाऊस होईल तेव्हा उरलेल्यांना पेरणी करता येईल. पेरणी करताना साधारणपणे यापुढे चार ओळी सोयाबीनच्या एक ओळ तुरीची अशा पद्धतीने पेरणी केली तर तूर आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना फायदा होऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकेल. याशिवाय काही ठिकाणी बाजरीची पेरणी थांबली, ज्वारीची पेरणी थांबलेली ही देखील खरी आहेत. त्यामध्ये आंतरपीक तुरीचे पीक घ्यायला पाहिजे. दोन ओळी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या आणि त्यानंतर एक तुरीची अशा पद्धतीने जर पेरणी केली तर दोन्ही पिकांचे उत्पादन मिळू शकेल. आता होणारा पाऊस हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खरिपात आधीच्या पेरण्या झाल्या त्यांना जीवदान मिळणार आहे. यापुढे होणाऱ्या पेरण्यांना देखील त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होतोय तसेच पुढेदेखील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

काही तुरळक ठिकाणी जोराचा पाऊस झाला तर तिथेच शेतातून पाणी काढून देणे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. अशा पद्धतीने पाऊस, हवामान आणि शेतीचा विचार करावा लागणार आहे. सर्व शास्त्रज्ञांच्या मते 2012, 2015, 2018 चा मोठा दुष्काळ असो वा कोल्हापूरला आलेला महापूर किंवा गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात झालेला पाऊस असो हे आणीबाणीचे संकेत देतात.