पुणे : ट्रान्सजेंडर लोकांसोबत समाजात नेहमीच भेदभाव होताना पाहायला मिळतो. अगदी रूग्णालयातही त्यांना वेगळी वागणूक दिल्याचे अनुभव आहेत. यामुळेच पुणे शहरात पूर्णपणे ट्रान्सजेंडर लोकांसाठी एक क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ट्रान्सजेंडर्सना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि प्रयोगशाळेच्या चाचण्यांची मोफत सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
'एक्सेलेरेट' नावाच्या पुण्यातील क्लिनिकमध्ये ट्रान्सजेंडर समाजातील लोकांना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. या क्लिनिकचे जिल्हा समन्वयक दीपक निकम यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की "सेवांमध्ये व्यक्तींचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी समुपदेशन सत्रांचा समावेश असेल. तसेच किरकोळ आजारांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्याची सुविधा आहेत. आम्हाला आशा आहे की हे केंद्र लवकरच सुरू होईल." "
निकम पुढे म्हणाले, की "या समुदायावर संशोधन केल्यानंतर आमच्या टीमच्या लक्षात आले की आम्ही ट्रान्सजेंडर लोकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरू केले पाहिजे. या पुढाकाराने आम्ही त्यांना अपेक्षित आरोग्यसेवा पुरवू शकू अशी आशा आहे."
यावेळी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या सोनाली दळवी म्हणाल्या, की "सामान्य रूग्णालयात उपचार घेताना स्थानिक लोकांकडून आमच्यासोबत खूप भेदभाव केला जातो. बर्याच महिलांना आमची उपस्थित खटकते. म्हणूनच आम्ही आशा करतो की या क्लिनिकद्वारे आम्ही ट्रान्सजेंडर लोकं आमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. "
पुण्यात दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असल्याने ट्रान्सजेंडर लोकांसाठी आता आशेचा किरण उदयास आला आहे.
16 सप्टेंबर 2020 रोजी अधिकृत प्रसिद्धीनुसार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने "ट्रान्सजेंडर पर्सन्स (हक्कांचे संरक्षण), अधिनियम, 2019" कायदा केला आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन्स मधील कायद्याच्या VII व्या अध्यायानुसार, इतर सदस्यांसह, रोटेशनद्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेशातील ट्रान्सजेंडर समुदायाचे पाच प्रतिनिधी आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणार्या अशासकीय संस्था किंवा संघटनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाच तज्ञ केंद्र सरकारने नामनिर्देशित केले पाहिजे. परिषद विविध धोरणांच्या प्रभावाचे मूल्यांकन करेल आणि ते निर्णय घेण्यास मोकळे आहेत.