पुणे: राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यभरात अतिमुसळधार ते मुसळधार सरी बरसत असताना पुण्यासह, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात मात्र पावसाने लपंडाव सुरू केला असून रिमझिम पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार  पुणे जिल्ह्यात हवेचा वेग कमी असून कमी दाबाचे पट्टे तयार होण्यास वेळ लागत असल्याने असे चित्र आहे.


गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथा, विदर्भ या भागात गेल्या काही दिवसांपासून २०० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस सुरू आहे. मात्र पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे. पुणे (Pune) शहरातील धरणसाठी २० जुलैपर्यंत ४५ टक्के इतकाच आहे. धरण्यात पाणी वेगाने येण्यासाठी पुणेकरांसह जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणाचा पाणीसाठी काही प्रमाणात वाढल्याने पाणीकपातीचं संकट टळलं आहे.


तर आज (रविवारी) सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.


गेल्या २४ तासांतील पाऊस (शहरासह जिल्हा) (मि.मी. मध्ये)


लोणावळा : ३४, गिरीवन : १६, निमगिरी : १०, माळीण : ४, पाषाण : २, बारामती : २, शिवाजीनगर : १.२, तळेगाव : १.२, चिंचवड : १, लवळे : १, राजगुरुनगर : १, खेड : ०.५, कोरेगाव पार्क : ०.५


राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता



हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती आण अकोला या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Rain) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीमवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.