Walmik Karad Surrender: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने आज पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये आत्मसमर्पण केलं. अखेर घटनेच्या 22 ते 23 दिवसांनी वाल्मिक कराड याने शरणागती पत्कारली. वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या प्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे, जे या प्रकरणात दोषी असतील त्या कोणालाही आम्ही सोडणार नाही असा इशारा यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.
जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही, तोपर्यंत...
माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माजी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की, तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतीले जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू, असे त्यांनी म्हटलं आहे.
तर वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होणार का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, कोणता गुन्हा दाखल होईल? कसा होईल? याबाबत सगळी माहिती पोलीस देतील. ते पोलिसांचे काम आहे. पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.