पुणे: पुण्यातील माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वसंत कृष्णाजी मोरे (Vasant More) यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई पुण्यातील शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police Station) ठाण्यामध्ये करण्यात आली आहे, तर विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
२५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वक्तव्ये देखील केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
तर फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, वसंत मोरे यांनी “लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते, ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे” असे वक्तव्य केले. तसेच हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सध्या कुटुंबीय भीतीच्या आणि तणावाच्या वातावरणात आहे, घरी भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं असल्याचेही फिर्यादींनी पोलिसांना सांगितले आहे. या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कुटुंबीयांवर मानसिक ताण आला
पुण्याचे माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याने वसंत मोरे वर गुन्हा दाखल केला आहे. 25 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत लहाडे दारू पिला होता त्याला बोलता येत नव्हतं ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत होता, असं वक्तव्य केलं होतं. लहाडे यांनी यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वसंत मोरे यांनी बदनामी केली त्यामुळे कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे असं तक्रारीत नमूद केलं होतं. या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ लहाडे हे तक्रारदार 72 वर्षाचे आहेत आणि त्यांचा ठेकेदाराचा व्यवसाय होता.
