Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यांच्या अडचणींत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. मोदी नावामुळे वाद झाला आणि त्यानंतर खासदारकी रद्द झाली. आता सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात राहुल गांधींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 


सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन सात्यकी सावरकर आक्रमक झाले आहेत. सात्यकी सावरकर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांचे सगळे आरोप खोटे आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी काल्पनिक कथा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 


ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी यापूर्वी लंडन दौऱ्यावर असताना वीर सावरकरांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. तसेच अनेक वादग्रस्त वक्तव्यही राहुल गांधी यांनी केली होती. त्यासदंर्भात बोलताना राहुल गांधी यांची ही कथा काल्पनिक आहे. यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानहानी होत आहे, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच, त्यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. 


राहुल गांधी केवळ व्होट बँकेसाठी तथ्य नसताना अशी वक्तव्य करत आहेत. आता याबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयानं आम्हाला 15 एप्रिलची तारीख दिली असून राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत महाराष्ट्र न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


काय म्हणाले राहुल गांधी? 


त्यासोबतच त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान देखील सावरकरांवर टीका केली होती. इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले होते. वाशिम जिल्ह्यातील सभेत त्यांनी सावरकरांवर ताशेरे ओढले होते. एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली होती. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानात बंदिस्त होते. त्यामुळे त्यांनी पत्रे लिहायला सुरुवात केली की, आम्हाला माफ करा, तुम्हाला जे हवं ते घ्या, मला तुरुंगातून बाहेर काढा, असं सावरकर म्हणाले होते, असा दावा राहुल गांधींनी केला होता.


राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी आडनावानरुन झालेल्या शिक्षेनंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर सात्यकी सावरकरांच्या तक्रारीनंतर नेमकं काय होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.