पुणे : भारतात राहून भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी चांगलाचं फैलावर घेतलंय. 'भारतात राहुन जे लोक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, त्यांना फाशीच दिली पाहिजे, अशी तीव्र भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे. हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या कला क्रीडा जीवन गौरव पुरस्कार समारंभात ते बोलत होते.

तसेच पुरस्कार परत करणाऱ्यांनाही गोखले यांनी चांगलच खडसावलं. ''भारत हा सहिष्णू देश आहे. पण ज्यांनी याला असहिष्णू म्हणत पुरस्कार वापसी केली, त्यांना पुरस्कार दिलेच कशाला?'' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विक्रम गोखले म्हणाले की, ''माझ्या देशात राहायचं, माझ्या देशाचे नागरिक म्हणून मिरवायचं, आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात. अशा व्यक्तींना फाशीच दिली पाहिजे. माझ्या दृष्टीने हा देशद्रोहच आहे.''

विशेष म्हणजे, पुरस्कार वापसी करणाऱ्यांचे दहशतवाद्यांशी हातमिळवणी करताना फोटो असल्याचाही दावा विक्रम गोखले यांनी यावेळी केला. ''अशा लोकांचा मी तिरसकार करतो. माझ्या देशात राहुन अशी कृती करायची असेल, तर त्यांनी या देशातून खुशाल चालतं व्हावं,'' असंही ते यावेळी म्हणाले.