मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील मीरारोड परिसरात माजी आमदाराच्या बांधकाम प्रकल्पात काम करणाऱ्या मजुराचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाला. या प्रकरणी अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. संबंधितांवर गुन्हादेखील दाखल झाला नसल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना चांगलंच धारेवर धरलं आहे. फडणवीस हे काशीला जाऊन बसले आहेत. आपण रोज विकासाचे गोडवे गात असतो.पण गरीबाच्या मृत्यूचे यांना काहीही नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे शिवाय या बिल्डरवर कारवाई कधी होणार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.


भाजपच्या एका माजी आमदाराच्या कन्स्ट्रक्शन साईडवर एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. एक वर्षापूर्वीदेखील एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मीरा भाईंदर येथे घटना घडली आहे. 22 मजली इमारत आहे. तिथं 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात नाही. भाजपचा एका माजी आमदाराची ही कन्स्ट्रक्शन साईड आहे. आमदार नरेन्द्र मेहता यांची ही साईट आहे. आत्तापर्यंत 4 ते 5 मृत्यू या ठिकाणी झाले आहेत. तरीदेखील याची दखल घेतली जात नाही. चार दिवसांपूर्वी याच आमदाराने फडणवीसांचा सत्कार केला आहे, असं ही त्या म्हणाल्या. 


 कोणत्याही बांधकामाच्या ठिकाणी जर दुर्घटना झाली तर त्या  बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र या प्रकरणात नरेंद्र मेहता आणि महेंद्र कोठारी यांच्यावर काही कारवाई झाली नाही.22 मजली इमारत आहे. पालिकेची नोटीस आहे की कामगारांचा जर मृत्यू झाला तर कंपनी जबाबदार आहे. मात्र तरीही कारवाई झाली नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. सरकारने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. त्यासोबतच घाटकोपरची दुर्घटना, पुण्यातील कार अपघात आणि डोंबिवलीतली घटना या सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहीजे, असंही त्या म्हणाल्या. 


कोस्टल रोडच्या कामावर टीका


यासोबतच विद्या चव्हान यांनी कोस्टल रोडच्या कामावरदेखील टीका केली आहे. कोस्टल रोडला सुरु होऊन काहीच महिने झाले आणि या रोडला भेगा पडल्या. त्यावरुन त्यांनी सरकारला लक्ष केलं आहे.  त्या म्हणाल्या मी मुंबईची आहे. इथल्या लाटा किती मोठ्या असतात मला माहिती आहे. पावसात जर समुद्र खवळला तर कोस्टल रोड वाहून जाऊ नये हीच अपेक्षा असल्याचा खोचक टोला त्यांनी सरकारला लगावला. कोस्टल रोडचे श्रेय घेण्यासाठी घाईघाईने केलेला हा रस्ता आहे. जबरदस्तीं सुरू केला आहे. 10 जूनला तुम्ही दुसरा भाग सुरु करत आहे हे ऐकले आहेपण आधी खात्री करा की तू पूर्णपणे झाला आहे का?लोकांच्या जीवाशी खेळू नका, असंही त्या म्हणाल्या.