N D Mahanor Passes Away : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात आज (3 ऑगस्ट)सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.


गेल्या पाच सहा महिन्यांपासून ते सातत्याने आजारी होते. तर हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना 20 दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज त्यांनी प्राण सोडले.


ना धों महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी इथे झालं. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना.धों. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी', ‘रानातल्या कविता' गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली. 


ही आमची वैयक्तिक हानी : सुप्रिया सुळे


पवार आणि महानोर कुटुंबांचे पाच दशकांपासून ऋणानुबंध आहेत. दोन्ही कुटुंबांच्या आयुष्यातील सर्व सुखदु:खाच्या प्रसंगात एकत्र वावरलो आहोत. वडिलांच्या जागी असणारा माणूस आज गेला. ही हानी कधीच भरुन निघणार नाही. ही आमची वैयक्तिक हानी आहे, त्यांच्या जाण्याने अतिशय दुख होत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांन एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.


प्रतिभावंत कवी मराठी साहित्य विश्वाने गमावला : मिलिंद जोशी, कार्यध्यक्ष, मसाप


अतिशय दुखद आणि धक्कादायक बातमी आहे. ज्या कवीचे प्राण रानामध्ये गुंतले होते, असा मोठा निसर्गकवी मराठी साहित्यविश्वाने गमावला आहे. शेती आणि कविता हे दुर्मिळ नातं असतं, ज्या कवीने आयुष्यभर शेतात राबून त्या रानाचीच कविता लिहिली असा कवी महानोरांच्या रुपाने गमावला आहे. त्यांची शेवटची भेट उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात झाली होती. त्यांच्या प्रकृतीविषयीच्या बातम्या कानावर येत होत्या. माणूस म्हणून ना धों महानोर मोठे होते. विधानपरिषदेत असताना त्यांनी केवळ साहित्याचे प्रश्न मांडले नाही तर समाज आणि विशेषत: शेतीचे प्रश्न देखील मांडले. समाजभान असलेला, ग्रामीण संस्कृतीशी एकरुप झालेला, साहित्य व्यवहाराकडे सकारात्मकदृष्टीने पाहणारा प्रतिभावंत कवी मराठी साहित्य विश्वाने गमावला अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.