पुणे : वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनीदेखील धडाधड राजीनामे दिले. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चा रंगल्या मात्र दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन असं ते राजीनामा देताना म्हणाले. त्यानंतर त्यांना विविध पक्षातून फोन आल्याचं ते म्हणाले. त्यासोबतच भाजपच्या मुरलीधर मोहोळांचा (Murlidhar Mohol) फोन आल्याचं त्यांनी सांगितलं. मुरलीधर मोहोळांचा फोन आल्याने ते भाजपात जाणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र वसंत मोरेंनी या सगळ्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.
वसंत मोरे म्हणाले की, मी राजीनामा दिल्यावर अनेकांना दु:ख झालं. अनेक लोक मला मिळत असलेली वागणूक बघत होते. ते निरिक्षण करत होते. राजीनामा दिल्यावर काही वेळात मला मुरलीधर मोहोळांचा फोन आला. मुरलीधर मोहोळ आणि मी जुने चांगले मित्र आहोत. त्यामुळे मुरलीधर मोहोळांनी माझं सांत्वन करण्यासाठी फोन केला होता. तात्या तुझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत हे चुकीचं झालं, असं मोहोळ म्हणाले. मोहोळांनी मला संघटनेसाठी फोन नाही केला मित्र म्हणून फोन केला, असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे.
वसंत मोरे भाजपात जाणार का?
मुरलीधर मोहोळांचा फोन आल्यानंतर वसंत मोरेंना भाजपात जाणार का?, असं विचारल्यावर मोरे म्हणाले की, भाजप हा मोठा पक्ष आहे. भाजप माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना का बोलवतील?, असा सवाल मोरेंनी उपस्थित केला. मी माझा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाशी मी ठाम आहे. पुढचा निर्णय नक्की दोन दिवसांत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सगळ्या पक्षात सध्या लोकसभेसाठी उमेदवारांची मोठी रांग आहे. वेळ आली तर मी अपक्षदेखील लोकसभा निवडणूक लढवणार, असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे. मनसेत माघारी जाणार का? विचारल्यावर माघारी फिरुन मला साहेबांना फसवायचं नाही आहे, असं ते म्हणाले आहेत.
मोहन जोशी, रुपाली ठोंबरेंनी घेतली वसंत मोरेंची भेट
वसंत मोरे यांनी मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्येही त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत वाॅशिंग मशिनचा मार्ग निवडू नये, असा टोला लगावला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून वसंत मोरेंना फोन येत आहेत शिवाय स्थिनिक नेत्यांनी देखील वसंत मोरेंनी भेट घेतली आहे. कॉंग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशींनी वसंत मोरेंची भेट घेतली आहे. तर अजित पवार गटाकडून रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील वसंत मोरेंची भेट घेतली आहे.
इतर महत्वाची बातमी-