Pune Varandha Ghat News: प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता पुणे  (Pune)  जिल्ह्यातील भोर आणि कोकण विभागातील महाडला जोडणारा वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. 29 जून रोजी मंदिरावर मोकळा दगड पडल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा म्हणून हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 
 
दुचाकी, तीन चाकी व हलकी वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद करुन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाद्वारे म्हणजेच पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


या भागाकडे जाण्यासाठी हा सर्वात लहान मार्ग असल्याने, दोन्ही जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वाहने घाट भागाचा वापर करतात. मर्यादित लेन आणि अचानक येणार्‍या वळणांमुळे गर्दी होत असल्याने ही वाहने घाटात वारंवार अडकतात. पावसाळ्यात या घटना नियमित घडतात. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यातच दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यात अनेकदा जीवित हानी होते. पावसाळ्यात नागरिकांची गैर सोय होऊ नये आणि नागरिकांंचं नुकसान होऊ नये, यासाठी सगळ्या स्तरावरुन दरवर्षी प्रयत्न केले जातात. वरंध घाटाबरोबरच पुण्याजवळील काही भीतीदायक किंवा आपत्तीजनक पर्यटन स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
पुणे जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP) आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली आणि पावसाळ्याच्या सुरुवातीसह व्यक्ती आणि जनावरांच्या स्थलांतराचे निरीक्षण केले.यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली जात आहे.