पुणे : पुण्यात काल (शुक्रवारी)रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बंडू आंदेकर याचा जावई आणि वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद ऊर्फ आयुष कोमकर (१८) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या,  काल (शुक्रवारी) रात्री पावणे आठच्या सुमारास दोघांनी गोविंद ऊर्फ आयुष कोमकर याच्यावरती तीन गोळ्या झाडून निर्घृण खून केला. गोविंद त्याच्या नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना हा हल्ला झाला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे नाना पेठ परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि तपासाला सुरूवात केली. काल हत्या झालेल्या ठिकाणी आज पोलिसांचा बंदोबस्त आहे, पुण्यातील नाना पेठेत कालच्या घटनेनंतर आज तणावपूर्ण शांतता आहे. काल झालेल्या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांना विसर्जन मिरवणुकीवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजित पवारांनी काल पुण्यामध्ये झालेल्या गॅंगवॉर, मर्डर याची माहिती घेतली आहे.

Continues below advertisement

नेमकं काय घडलं?

वर्षभरापूर्वी १ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून केला जात होता, अशी माहिती तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी मिळाली होती. टोळीने आंबेगाव पठार भागात रेकी केली होती, त्याबाबत पोलिसांनी कारवाई देखील केली होती; मात्र, हल्ला थेट नाना पेठेच्या मध्यवर्ती भागात घडवून आणला. गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्लासवरून येऊन गोविंद हा त्याच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये थांबला असताना त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी तीन गोळ्या झाडल्या. गोविंद याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या खुनामुळे पुणे शहरात परत एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसांनी काय दिली माहिती?

शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आयुष उर्फ गोविंद कोमकर हा तो राहत असलेल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आला असता, दोघांनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची सहा पथके, तसेच स्थानिक पोलिसांची पथके देखील रवाना झाली आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

दोन दिवसांपूर्वी दोघांना गुन्हे शाखेने पकडले होते...

कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट १च्या पथकाने सोमवार पेठ परिसरातून पिस्तुलासोबत पकडले होते. या दोघांनी आंदेकर टोळीला पिस्तुले पुरवल्याचा संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास देखील सुरू केला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यासह आठ जणांविरोधात मंगळवारी (दि. २) भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालीम आस मोहंमद खान ऊर्फ आरिफ (२४, रा. लोणीकाळभोर) आणि युनूस जलील खान (२४, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. हे दोघे टिपू पठाण टोळीतील सदस्य आहेत. तालीम याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

फोन करून पाच वेपन घेऊन...

आंदेकर खुन प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते आणि त्यांच्या साथीदारांची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत. त्यांच्या घराची रेकी करून कट रचल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी अमन पठाणसोबत तालीम खान याचे संभाषण झाल्याचे समोर आले होते. आंदेकर टोळीतील सदस्य दत्ता काळे हा कृष्णा आंदेकरच्या संपर्कामध्ये होता. त्यानेच काळेला पाच हजार रुपये भाड्याने खोली घेण्यासाठी दिले होते. काळे याने कृष्णाला आरोपींच्या घराची माहिती दिली होती. कृष्णा याने अमनला पाठवून देतो असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी कृष्णाने कॉल न घेतल्याने काळे याने यश पाटीलला फोन केला. त्यानेही अमनचे नाव घेतले. कृष्णाने काळे याला फोन करून पाच वेपन घेऊन पाठवल्याचे सांगितले. अमनने कॉल करून लक्ष ठेवा, बाहेर आला की सांगा असे म्हटल्याचे काळेने पोलिसांना तीन दिवसांपूर्वी सांगितले होते.

आंदेकर टोळी होती बदल्याच्या तयारीत

वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात आंदेकर टोळी असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. सोमनाथ गायकवाडचा मुलगा आणि बायको, यासह अनिकेत दुधभाते याचा भाऊ त्यांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, शुक्रवारी ८ वाजता फरार असलेल्या आरोपींपैकीच काहींनी गोविंद ऊर्फ आयुषचा गोळ्या झाडून खून केल्याने पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याचं दिसून येतंय.