पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान वैष्णवीने ज्या फॅनला गळफास लावून घेतला आणि ज्या साडीचा वापर केला. बावधन पोलीस ते फॅन आणि साडी फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवणार आहेत. वैष्णवीचे कुटुंबीय ही हत्या आहे, असा संशय वारंवार व्यक्त करत आहेत. त्या अनुषंगाने हा फॉरेन्सिक रिपोर्ट महत्वाचा ठरणार आहे.

 वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. वैष्णवीने साडीच्या साह्याने घरातील पंख्याला गळफास घेतला होता. त्यामुळे साडी आणि पंखा आज (मंगळवारी) न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात येणार आहे. हा पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का, याची तपासणी देखील होणार असल्याची माहिती आहे. वैष्णवी हगवणे हिने भुकूम येथील आपल्या घरी सासरच्या त्रासाला कंटाळून 16 मे रोजी घरात गळफास घेतला होता. त्यानंतर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिष्मा आणि सहआरोपी नीलेश चव्हाण याला अटक केली आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे. 

आत्महत्या की हत्या?

वैष्णवीला होत असलेला सासरकडचा त्रास, मारहाण यामुळे वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं, मात्र ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे, असा संशय वैष्णवीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता सर्वच दृष्टीकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. तिचे वजन 71 किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले आहे. हा घरातील पंखा वैष्णवीचं 71 किलो वजन पेलू शकतो का हे तपासण्यासाठी साडी, पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे. या शिवाय नीलेश चव्हाणच्या ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि मोबाइलही तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

नीलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी तो जप्त केला. मात्र, तो माझा नाहीच, असे नीलेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हा लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर लॅपटॉमध्ये काय आहे याचा उलगडा होणार आहे.

तिघांना आज हजर करणार

राजेंद्र आणि शशांक हगवणे या पितापुत्रासह नीलेश चव्हाणची पोलिस कोठडी संपत असल्याने आज (मंगळवारी) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आणखी तपासासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिस करणार आहेत.

पती-सासूला महाळुंगे पोलिस आज घेणार ताब्यात

वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता यांच्याविरोधात आर्थिक फसवणूकप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज न्यायालयाकडे गेला आहे. आज(मंगळवारी) न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोघांना म्हाळुंगे पोलिस ताब्यात घेणार आहेत.