Pune: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला आहे.आज माऊलीच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली आहे. संपूर्ण आळंदी नगरीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वर्षी घुंडरे कुटुंबातील विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या भागांतून उत्कृष्ट अशा बैलजोड्या खरेदी केल्या असून त्यांचे सराव आणि पोषण याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. (Pune News)
माऊलींच्या पालखीत बैलजोडीचा मान घुंडरे घराण्याकडे
यंदा घुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे. विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत. विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून येथून राजा-प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे. तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे.
उत्कृष्ट बैलजोड्या अन् खुराकही..
अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी, पुणे येथून 5 लाख 51 हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली, तसेच दुसरी बैलजोडी माऊली व शंभू ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी केला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत, बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबर्याचा भुगा, बैलखाद्य मिक्स आदी देत आहेत.
माऊलींचा पालखी सोहळा कधीपासून?
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा यंदा गुरुवार, 19 जून 2025 रोजीआळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने जाहीर केलेल्या यंदाच्या सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केल्यानुसार, हा पालखी सोहळा सुमारे 256 किलोमीटरचा पायी प्रवास करत आषाढ शुद्ध दशमी, शनिवार 5 जुलै रोजी पंढरपूरात दाखल होईल. त्यानंतर रविवारी, 6 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महाउत्सव पंढरपूरात पार पडणार आहे.
हेही वाचा
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?