पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने टोकाचं पाऊल उचललं. जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती, सासू व नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती.मात्र सासरा आणि दीर फरार होते. त्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर फरार सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. 

गेल्या सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते. आज (शुक्रवारी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटके आधी जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तर वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे तळेगाव मधील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. आज पहाटे साडेचार वाजता अटक केलेले आहे. दरम्यान ते अशा प्रकारे मोकाट फिरत असताना पोलिसांच्या हाती लागले नाहीत का? पोलिसांनी कसा तपास करत होते, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.  पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी हगवणे पितापुत्राला बेड्या ठोकल्या. पहाटेच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले.

नेमकं काय आहे प्रकरण?

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार होते. त्या दोघांना आज अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.