पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचंही नाव चर्चेत आलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. अंजली दमानियांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की, "सुपेकर यांची या प्रकरणात भूमिका संशयास्पद आहे आणि त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे." यासोबतच रुपाली ठोंबर पाटील यांनीही सुपेकर यांच्यावर आरोप करत प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “मी या प्रकरणाशी कुठलाही संबंध ठेवत नाही. सत्य समोर यायला हवं, मी चौकशीला तयार आहे,” असं म्हटलं आहे.

डॉ. जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण

मागील दोन वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे. त्यामुळे कार्यकारी पोलिस दलातील कोणताही घटक हा माझ्या आधिपत्याखाली नाही. त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे, असे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना मदत केली, असा आरोप डॉ. सुपेकर यांच्यावर होत आहे. 

इतरही आरोपांवर दिलं उत्तर

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले, त्यामध्ये हगवणेंनी डॉ. जालिंदर सुपेकर यांचं पाठबळ आहे असं दाखवत मोठ्या सुनेला मयुरी हगवणेला देखील धमकावल्याचं समोर आलं आहे. सुपेकरांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार, शस्त्र परवाना देण्याच्या अधिकार, पोलिस निरीक्षक आत्महत्या याबाबत आरोप होत आहेत. पोलिस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात आमचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. तुरुंग विभागातील खरेदी 350 कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही. ती खरेदी ही शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते. त्या समितीचा मी फक्त एक सदस्य आहे.  तर शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलिस आयुक्तांना असतात. तत्पूर्वी त्या अर्जावर  स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलिस उपायुक्तांना देतात, असे डॉ. सुपेकर यांनी सांगितले.

नेमकं काय प्रकरण?

"जालिंदर सुपेकर हे शशांक हगवणेचे मामा आहे. त्यांचा धाक दाखवून हगवणे घरातील सुनांना त्रास द्यायचे, धमकवायचे. हगवणेंच्या मोठ्या सुनेने मयुरीने (राजेंद्र हगवणेच्या मोठ्या मुलाची सुशीलची पत्नी) जेव्हा तक्रार केली होती, तेव्हा तक्रारीवर सुद्धा हे लोक फरार होते. मग परत आले. त्यांना (मयुरीच्या कुटुंबाला)धमकावण्यात आलं की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही. जालिंदर सुपेकर यांचं पाठबळ असल्याचं दाखवत हगवणेंनी सुनांना त्रास देणं सुरूच ठेवलं होतं.