पुणे : तबलानवाझ, उस्ताद झाकीर हुसेन यांची एक आगळीवेगळी मैफल पुण्यात रंगली. या मैफीलीत उस्तादजींना साथ देण्यासाठी येरवडा कारागृहातील कर्मचारी आणि कैदी होते. कैद्यांच्या परिवर्तनासाठी आयोजित या मैफीलीमुळे येरवडा तुरुंगाच्या भिंतींनीही सूर-ताल आणि तबल्याचा ठेका अनुभवला.


उस्ताद झाकीर हुसेन यांनी जगभरात असंख्य कार्यक्रमांमधे त्यांच्या बोटांची जादू सादर केली आहे. परंतु पुण्यातील ही मैफील त्यांच्यासाठीही खास होती. एरवी कैद्यांचा आक्रोष आणि हुंदके एकण्याची सवय असलेल्या भिंतींनाही हा अनुभव नवीन होता. पुण्यातील भोई फाऊंडेशन आणि आदर्श मित्र मंडळाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कैद्यांमधील एकाने मोहम्मद रफींचं गाणं सादर केलं, ते ऐकून उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यावर वयाने लहान असलेले कैदी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता असते. त्यांना यापासुन रोखण्यासाठी येरवडा कारागृहात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना कैंद्याना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं जातं. झाकीर हुसेन यांनी या कैद्यांशी तबल्याच्या माध्यमातून साधलेला संवाद आणखीच खास होता.