पुणे : देशभरात सध्या कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मुंबईत लोकल प्रवास, मॉलमध्ये प्रवेश अशी नियमावली करण्यात आली असतानाच आता पुण्यात पीएमपीएलचा (PMPML) प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल पासची सक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पीएमपीएल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीएल प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक राहणार आहे. आजपासून पुण्यात या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
युनिव्हर्सल पास किंवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्यास प्रवाशांना बसमधून प्रवास करता येणार नसल्याचे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. पीएमपीएल प्रशासनाने कोरोनाच्या नियमांचे बसमध्ये कडक पालन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंलजबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात वाहकांना सूचना देण्यात येणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर बसमध्ये सुध्दा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात कालही 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात 41 हजार 327 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल राज्यात 40368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णाची संख्या 68,00,900 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3% एवढे झाले आहे.
महत्वाच्या बातम्या