पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली  देशभर संशयितांवर कारवाई सुरू आहे. पुणे पोलिसांच्या सहा पथकांकडून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, रांची आणि हरियाणा या शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली. या कारवाईनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.


प्रसिद्ध कवी वारावर राव यांना हैदराबादमधून अटक केली आहे. ठाण्यात अरुण फरेरा आणि मुंबईत व्हर्नोन गोन्साल्वीस यांच्या घरांची झाडाझडती घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली आहे. सुधा भारद्वाज यांच्या रांचीमधून तर दिल्लीमध्ये गौतम नवलखा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


या सर्वांवर आयपीसीच्या कलम 153 अ, 505(1)ब, 117, 120 ब, 13, 16, 18, 20, 38, 39, 40 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे सर्वजण नक्षलवाद्यांसाठी शहरी भागात थिंक टँक म्हणून काम करत होते, असा पोलिसांना संशय आहे. या छाप्यातून महत्वाची कागदपत्र, पुस्तकं, पत्रं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.


पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत जे लोक सहभागी झाले होते, त्यांच्या घरांची झडती घेतली जात आहे. या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवले होते, असं पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकांनी देशभरात विविध ठिकाणी छापे मारले.


कोरेगाव-भीमामध्ये काय घडलं होतं?
कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 जानेवारीला विजय दिवस साजरा करण्यात आला. कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.


कुणावर गुन्हे दाखल झाले?
या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसरीकडे, एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.