पुणे : राजधानी मुंबईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज पुण्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. आजही त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल करत, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. तसेच, पुण्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर भाष्य करत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व मंत्रिमंडळातील नेत्यांवरही हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी मुंबईतील विधानाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्यानंतर, पुण्यातील (Pune) पूरस्थिती आणि खड्ड्यांवरूनही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
खड्ड्यांचं पुणं झालंय, पण सगळीकडेच खड्डे झाले आहेत, मुंबईतही खड्डेच खड्डे झाले आहेत. आमचे नितीन गडकरी छातीठोकपणे सांगत होते की, मी असे रस्ते बनवेण की 200 वर्षे खड्डेच पडणार नाहीत. पण, अजूनही रस्ते होत नाहीत, कोकणातील मुंबई-गोवा महामार्ग अजूनही होत नाही. गणपती बाप्पा व चाकरमान्यांसाठी दरवर्षी रस्त्यावर खड्डे बघायला जाण्याची नाटकं होतात. जसं युगपुरुष असतं तसं खड्डापुरुष असा पुरस्कार द्या सगळ्यांना. टरबूज जाऊ द्या ओ, कुठंही खड्ड्यात घाला त्याला, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर हल्लाबोल केला.
पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याचा यांचा प्रयत्न आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय. हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे. ज्या कंत्राटदाराने संसद भवन बांधलं. तोच गुजरातचा कंत्राटदार पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प करतोय. नव्या संसद भवनालाही गळती लागलीय, राम मंदिराला गळती लागली होती. यांचं सगळंच गळतंय, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
वाघनखं अन् मुनगंटीवार कुठं जुळतंय का?
मुनगंटीवार म्हणतात की शिवाजी महाराजांची वाघनखे आणली. त्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता की नाही माहीत नाही. पण, त्या वाघनखांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा होता. ही वाघनखे मुनगंटीवारांनी आणली आहेत. वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतंय का, असा सवाल उपस्थित करत मुनगंटीवारांची खिल्लीही उडवली.
अमित शाह अहमदशाह अब्दालीचा वंशज
आजपासून मी अमित शहाला अहमदशहा अब्दाली म्हणणार. तो मला नकली संतान म्हणतो, औरंगजेब फॅन क्लब म्हणतो, तर मी देखील त्याला अहमदशहा अब्दाली म्हणणार. तो अहमदशहा अब्दालीचाच वंशज आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशी भाजपची राजकीय कबर बांधा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.