Uday Samant Exclusive: आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने  मी सुखरुप आहे मला कोणतीही ईजा झाली नाही. सुभाष देसाईंचा आणि हल्ले करणाऱ्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. लोकशाहीमध्ये एखादा विचार बदलणं चांगल्या गोष्टींसाठी उठाव करणं याचा परिणाम अशा हल्ल्यात होत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. घडलेल्या प्रकारावर मी फार बोलत नाही याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझाला दिली आहे.


माझ्या गाडीच्या मागे मुख्यमंत्र्यांची गाडी येण्याची शक्यता होती. त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत देखील होते. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली असती तर त्यांच्यावर देखील हा हल्ला होऊ शकला असता, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.


शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल (2 ऑगस्ट) कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली . शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचं शिंदे गटाचं मत आहे.  मात्र या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण हिंसक झाल्याचं चित्र आहे.


राजकारणाची लढाई ही विचारांची असते. त्यामुळे विकासाबाबत विचार करावा, कालचा जो हल्ला झाला तो ज्यांनी केला त्यांची मला कीव येते. टीकेचं उत्तर विकासकामे करुन द्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. मी बोलत नाही. उत्तर देत नाही प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ माझ्यावर चांगले संस्कार आहेत. मी काहीच करु शकत नाही असा जर कोणाचा गोड गैरसमज असेल तर चुकीचं आहे. मी सामान्य कार्यकर्ता असतो आणि माझ्या नेत्यांनी असं केलं असतं तर मी स्वत: त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, असंही ते म्हणाले.


राजकारण हे आरोग्यदायी असलं पाहिजे. मात्र हे राजकारण हिंसक होत आहे. कात्रजमध्ये आदित्य ठाकरेंचं आक्रमक भाषण झालं होतं. त्यांनी आम्हाला अर्वाच्च भाषेत बोलणं गद्दार म्हणणं यात काही नवीन नाही. मात्र हत्यारं घेऊन लोकं जर सभेला येत असेल तर हे चुकीचं आहे. माझी गाडी जात असताना मला वाईट भाषेत बोलत होते. त्यानंतर अनेक तरुणांनी हल्ला करायला सुरुवात केली. मात्र त्या हल्ल्यात मी वाचलो. मात्र राजकारणाची पातळी घसरली आहे. याचं प्रतिक म्हणजे कालचा हल्ला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. सेना स्टाईलने उत्तर देऊ अशा धमक्या देतात तर नारायण राणेंना नाव ठेवायचा यांचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मला आदर होताच मात्र कालच्या त्यांच्या वागणुकीमुळे आदर वाढला. त्यांनी मला कुटुंबीयांसारखं जपलं. मुख्यमंत्री असून देखील ते दीनानाथ रुग्णालयात माझ्याबरोबर थांबले. असा मुख्यमंत्री होणे नाही. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा त्यांच्या प्रवास आहे. मात्र मुख्यमंत्री असूनसुद्धा ते माझी सतत चौकशी करत होते. काही सुरक्षारक्षक माझ्यासाठी ठेवले होते. त्यामुळे मी कायम एकनाथ शिंदेच्या सोबत असेल, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.