पुणे : एनआयएने पुण्यातून 20 वर्षीय तरुणी सादिया शेख आणि 28 वर्षीय नबील सिद्दीकी खत्री या अटक केलीय. या दोघांना अटक करताना एनआयएने महाराष्ट्र एटीएसची देखील मदत घेतलीय. खरंतर सादिया शेखला 2016 साली देखील इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मुस्लीम धर्मगुरूंच्या मदतीने सादियाचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला तिच्या कुटंबाच्या ताब्यात सोपवले होते. परंतु ती पुन्हा दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा दावा करत एनआयएने तिला पुन्हा एकदा अटक केलीय. सादीयाच्या आईने मात्र तिच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत.


सादिया शेख ही पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या रडारवर आलीय. यावेळी एनआयएच्या पथकाने सादियाला पुण्याच्या येरवड्यातून अटक करताना तिच्यासोबत कोंढवा भागात राहणाऱ्या नबील सिद्दिकी खत्री या तरुणालाही अटक केलीय. या दोघांना पुढील तपासासाठी एनआयएचे पथक विमानाने पुण्याहून दिल्लीला घेऊन गेलंय. मार्च महिन्यात एनआयएने दिल्लीमध्ये इसिस संघटनेचे काम करणाऱ्या एका जोडप्याला अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सादिया आणि नबील हे त्यांच्या संपर्कात असल्याचं समोर आल्याचा एनआयएचा दावा आहे.


सादिया शेख ही मागील चार वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. ती जेव्हा फक्त 16 वर्षांची होती तेव्हा ती इंटरनेटच्या माध्यमातून इतर देशातील इसिसच्या संपर्कात आली होती. तोपर्यंत इतर कोणत्याही सर्वसाधारण मुलीप्रमाणे जीन्स-टी शर्ट घालणाऱ्या सादियाचं वर्तन इसिसच्या संपर्कात आल्यानंतर अचानक बदललं आणि ती बुरखा घालायला लागली. तिच्या इंटरनेट सर्फिंग आणि सोशल मीडिया प्रोफाईलवरुन ती सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली. मात्र त्यावेळी ती अल्पवयीन असल्यानं तिचं मत परिवर्तन करण्यासाठी मुस्लीम धर्मगुरूंची मदतही पोलिसांनी घेतली होती .


मात्र पुढे सादिया स्वतः धर्मशास्त्राचा अभ्यास केल्याचा दावा करू लागली. 2018 साली तिने काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संपर्क करण्यासाठी काश्मीरमध्ये नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतला आणि ती पुण्याहून काश्मीरला गेली. तिथे ती जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या रडारवर आल्यावर त्यांनी तिला ताब्यात घेऊन पुण्यातील तिच्या आई-वडिलांकडे सोपवलं होतं. त्यानंतर सादिया आणि तिच्या आईने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांनी ठेवलेले सगळे आरोप नाकारले होते.


आता पुन्हा एकदा ती इसिसच्या संपर्कात आल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे यावेळी ती एकटी नसून तिच्यासोबत नबील सिद्दिकी खत्री हा पुण्यातील तरुणही इसिसच्या संपर्कात असल्याचं एनआयएने म्हटलंय. दुसरीकडे सादियाचं कुटुंब ती निर्दोष असल्याचा पुन्हा एकदा दावा करतंय. त्यामुळे एनआयएच्या तपासात नक्की काय निष्पन्न होतं हे महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून कोवळ्या वयातील तरुण-तरुणींच ब्रेनवॉश करणं किती खतरनाक ठरु शकतं हे पुन्हा एकदा दिसून आलंय.


Pune-Pimpri Lockdown | पुणे, पिंपरीत 10 दिवसांचा लॉकडाऊन, दुकानं सुरूच ठेवणार व्यापाऱ्यांचा विरोध