पुणे : पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. दोनही मुलं आईसोबत डी मार्टमधून खरेदी करुन घरी परतत होते. रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या तिघांना कारनं धडक दिली.


आज दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलांची आई गंभीर जखमी झाली आहे.

मुलांना धडक देणारी गाडी एक महिला चालवत होती. ही महिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील तिघांना जोरदार धडक दिली. ती एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. अद्याप पोलिसांनी या महिलेला अटक केलेली नाही.

व्हिडीओ