पुणे : कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा डेक्कन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  सागर अशोक हांडे ( वय 25) आणि दयानंद भीमराव खराटे (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडे आतापर्यंत केलेल्या चौकशीत त्यांनी अनेक लोकांच्या कोविड RT-PCR चाचण्यांचे बनावट रिपोर्ट तयार करून दिले आहेत. 


डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीनपॅथ डायग्नोस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या लॅबच्या नावाने अज्ञात व्यक्ती कोविड RT-PCR चाचण्यांचे बनावट रिपोर्ट देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून वरील दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.


प्राथमिक चौकशी नुसार आरोपींनी अनेक लोकांचे कोविड RT-PCR चाचण्यांचे बनावट रिपोर्ट बनवून दिल्याची सांगितले. या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपींचा समावेश आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी वेळीच या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता मान्यताप्राप्त असलेल्या लॅबमधूनच चाचणी करून खात्रीशीर रिपोर्ट घ्यावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.