PCMC Crime News: पुण्यातील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संस्थानचे आजी-माजी विश्वस्त थेट जुगार खेळताना रंगेहात अटकेत आलेत. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविकेच्या पतीसह 26 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईनंतर वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एक बंदावस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर हा पत्त्यांचा खेळ रंगला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याची खातरजाम केली आणि त्यानुसार मंगळवारच्या रात्री सापळा रचला. एका मागोमाग एक असे 26 जण कंपनीत दाखल झाले. सर्वांच्या हातात पत्ते पडू लागले, नोटांची बंडलं खुलू लागली, डाव मारणारे आनंदी तर पैसा डुबणारे नाराजीत होते. तितक्यात पोलिसांनी तिथं छापा टाकला आणि सर्वानाच धक्का बसला.
पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून कोणालाच निसटता आलं नाही. पोलिसांनी सर्वांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा पोलिसांना ही धक्का बसला. कारण या सहवीस जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे ही जुगार खेळत होते. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक मयूर टिळेकर, एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशींचा ही समावेश आहे. अटकेत असलेल्या सहवीस जणांकडून पस्तीस लाखांचा ऐवज ही जप्त करण्यात आलाय. जुगार खेळणाऱ्यांमध्ये देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त सापडल्याने वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडालेली आहे.
एकाच वेळी 8 जुगार अड्ड्यावर छापे, 94 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये के.के. मार्केट व संविधान चौकात सुरु असलेल्या अवैध ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरु असलेल्या आठ जुगार अड्यांवर पोलिसांनी छापा टाकला होता. यात 11 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तब्बल 94 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भातील पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचला आणि बनावट ग्राहक आणि पोलीस पथकासह जात ही मोठी कारवाई करण्यात आली होती.