Uday Samant In Attack: शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत ( यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज परिसरात हल्ला झाला. मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पुणे दौऱ्यावर होते. दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत प्रवास करत होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचाच उदय सामंत यांची गाडी एक भाग होती. मात्र उदय सामंतांनी मध्येच मार्ग बदलला होता. ताफ्यासोबत असलेला मार्ग का बदलला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


कौन्सिल हॉल - हडपसर- सासवड- जेजुरी - पुन्हा हडपसर असा सामंत यांचा प्रवास मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत प्रवास होता. मात्र संध्याकाळी हडपसरमधील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा गाडीतून आमदार तानाजी सावंत यांच्या घराकडे निघाला तेव्हा उदय सामंत यांची गाडी या ताफ्यातुन वेगळी झाली.


पुण्यातील कात्रज चौकात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. तानाजी सावंत यांचं घरदेखील कात्रज भागात आणि आदित्य ठाकरेंच्या सभेपासून काहीच अंतरावर होतं.  मात्र कोणतीही संघर्ष घडू नये यासाठी पोलीसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी  कात्रज चौकाचा मार्ग न निवडता बिबवेवाडीचा मार्ग निवडला होता. 


मुख्यमंत्र्यांचा ताफा हडपसर- खडी मशिन चौक- कोंढवा- बालाजीनगर, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या मार्गाने आमदार तानाजी सावंत यांच्या घरी पोहचला. मात्र उदय सामंत हे एकटेच हडपसर- खडी मशीन चौक- कात्रज चौक या मार्गाने आले आणि थेट सभेच्या ठिकाणी पोहचले. कात्रज चौकात सभा आहे आणि समोर त्या सभेसाठी जमलेली गर्दी दिसत असतानाही उदय सामंत यांनी ऐनवेळेस मार्ग का बदलला? , असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


या हल्ल्यानंतर पुणे पोलीसांनी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर 252,120 ,307 ,332 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.


त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या गाडीच्या मागे मुख्यमंत्र्यांची गाडी येण्याची शक्यता होती. त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत देखील होते. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली असती तर त्यांच्यावर देखील हा हल्ला होऊ शकला असता, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.