Rupali Patil Thombare: जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटलं, ही पाकीटमारांची टोळी आहे. त्यांच्यात हिंमत होती, तर अजित पवार म्हणाले असते, शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतलं, तसं मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी चोरून माझी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत, त्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


जितेंद्र आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे. जितेंद्र आव्हाड स्वतः महापाकीटमार चोर आहेत. ज्यांना कावीळ झाली असते त्यांना जग पिवळे दिसते. निवडणुकीला सामोरे जात असताना तुमच्या मतदारसंघात विकासाचे केलेले एखादं काम जनतेला सांगा. जितेंद्र आव्हाड यांची ही केविलवाणी धडपड सुरू आहे. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळ्यात मोठे घरभेदी असल्याचा टोला देखील रूपाली ठोंबरे यांनी लगावला आहे. तर त्यांच्या पक्षातील लोकांना विनंती जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीने उपचार करा, अन्यथा आम्ही कायदेशीर उपचार करत जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. 


नेमकं काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड? 


अजित पवारांचा गट हा पाकिटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वतःचे वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजले असते. ज्या काकांनी देशभरात स्वतःचा पक्ष पसरवला आणि वाढवला. त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घेतलं. पण जनतेला सत्य माहीत आहे.


जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया


मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळेला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधाने केल्यामुळे अनेकदा अडचणीत आलेला आहात. हे लक्षात ठेवा आणि माझा सल्ला राहील त्यांना आहे. मानायचा की नाही त्यांनी पाहावं. परंतु आपण शब्द कुठले वापरावेत यांचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि ते विचारपूर्वक वापरले पाहिजेत. आपण कोणाला काय बोलतो कोणाला पाकीट मार म्हणतो त्याचा विचार करावा. ज्यांनी 20-30 वर्ष तुमच्यासोबत काम केलं, उभे राहिले. ते सगळ्यांना ते लागू होतं. मला असं वाटतं की एवढ्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांना राजकीय आयुष्यामध्ये पुढे आणण्यासाठी शरद पवारांचा हात आहे आणि छगन भुजबळ यांचा देखील त्यामध्ये वाटा आहे. हे त्यांना माहिती आहे ज्यावेळी तुम्ही एखादं विशेषण लावता पार्टीला त्यामुळे ते सर्वांनाच दुःखदायक वाटतं. त्यामुळे थोडसं सांभाळून शब्द त्यांनी वापरले पाहिजेत.