मुंबई : शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कायमच वाहतूक कोंडी होते. यावर वाहतूक पोलिसांनी उपाय काढला आहे. सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान तीन ॲक्सल, मल्टी ॲक्सल व ओडीसी वाहनांना विशिष्ट वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) आर.के. पद्मनाभन यांनी याबाबत माहिती दिली.


जड वाहनांना कधी बंदी?

मुंबई-पुणे मार्ग : शुक्रवारी संध्याकाळी किंवा दोनपेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असून शनिवारी सकाळी किंवा दोन व त्यापेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पुणे-मुंबई मार्ग : रविवारी संध्याकाळी किंवा सुट्ट्या समाप्त होण्याच्या शेवटच्या दिवशीच्या संध्याकाळी 5 ते रात्रौ 8 वाजेपर्यंत तसेच कुसगांव येथे NH 04 वर व उर्से येथे द्रुतगती मार्गावर डाव्या बाजूला सोमवारी सकाळी किंवा सुट्‌ट्यानंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिनाच्या सकाळी 6.30 ते 09.30 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.