Pune Crime News:  पुण्यात हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीने तरुणाकडून 67 लाख रुपये उकळले आहेत. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एका महिलेने तरुणाकडून तब्बल 67 लाख रुपये उकळले. चेतन रवींद्र हिंगमारे (रा. कालेपडळ, हडपसर) निखिल उर्फ गौरव म्हेत्रे (२७, गाडीतळ, हडपसर) आणि एक तरूणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे


सोशल मीडियावरची ओळख भोवली
तरुणीची आणि तक्रारदाराची ओळख सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर त्यांच्या चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही दिवसांनी त्यांनी शरीर संबंध ठेवायला सुरुवात केली. याच दरम्यान मुलीने पैसे मागायला सुरुवात केली. तरुणाने नकार दिला असता. त्याला अनेकदा धमकवण्यात आलं. तरुणाची समाजात ओळख असल्याने त्याने फार विनवण्या केल्या मात्र तरुणी आणि तिच्या दोन मित्रांनी मिळून त्याच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी अक्षय तांबे यांनी फिर्याद दाखल केली आहे.  पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ब्लॅकमेल करत दिला त्रास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या दोघांमध्ये झालेली ओळख शरीर संबंधापर्यंत पोहचली.या तरुणीने तिच्या 2 साथीदारांसह फिर्यादीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अल्पवयीन असून बलात्कार केला आहे आणि यातून गर्भधारणा झाली आहे असं सांगत तरुणाला धमकी दिली होती. प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील म्हणून त्या तरुणीने 67 लाख रुपयांची मागणी केली 


बदनामी नको म्हणून दिले 67 लाख
समाजात बदनामी होऊ नये यासाठी त्या तरुणाने 67 लाख रुपये त्या तरुणीला दिले मात्र त्या तरुणीने आधिक पैसे मागायला सुरुवात केली.दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.


सध्या सगळीकडेच सोशल मीडियावरुन झालेल्या मैत्रीतून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियावरुन ओळख झाल्यानंतर धमक्या, ब्लॅकमेलिंग, शिव्या-शाप देण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. त्यातुन तरुणींचा फायदा घेत अनेक लोक पैसे उकळतात. तरुणीसुद्धा बलात्काराच्या धमक्या देत तरुणाकडे पैशाची मागणी करतात. त्यामुळे सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींशी बोलताना सावधगीरी बाळगण्याची गरज आहे, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.