पुणे : कोरोना महामारीमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अशा परिस्थिती वाहतूक बंद असल्याने रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्या कमाईत घट झाली आहे. तरीदेखील अशा महामारीच्या परिस्थितीत प्रामाणिकपणा हरवलेला नाही. पुण्यातील विठ्ठल मापारे हे त्याचेच एक उदाहरण आहे.


रिक्षाच्या तोडक्यामोडक्या कमाईवर घर चालवणाऱ्या विठ्ठल मापारे यांच्या रिक्षात तब्बल 11 तोळे सोने व रोख रक्कम मिळून आली. आर्थिक अडचण असतानाही विठ्ठल मापारे यांनी आपल्या रिक्षात 11 तोळे सोनं आणि 20 हजारांची रक्कम विसरुन गेलेल्या प्रवासी जोडप्याचा ऐवज जबाबदारीने पोलिसांकडे परत केली. मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर मुंढवा येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास खुदुस मेहबुब शेख व त्यांची पत्ती शहनाज शेख रिक्षात बसले. गाडीतळ बसस्टॉप याठिकाणी त्यांना सोडून मापारे यांनी त्याची रिक्षा बी.टी.कवडे रोड पामग्रोव्हज रिक्षा स्टॅन्ड येथे आणून रांगेत लावली. मापरी चहा पिण्यासाठी बाहेर गेले ते चहा पिऊन मागे आल्यानंतर त्यांना रिक्षा सीटच्या मागे एक बॅग दिसली. संबंधित बॅग ही अगोदरच्या प्रवाशाची असावी असा संशय आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.


सुदैवाने आपण पैसे विसरल्याचं महिला प्रवाशाला लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनला याबाबत संपर्क करुन बॅगबाबत माहिती देऊन कोणी विचारण्यास आल्यास त्यांना घोरपडीगाव पोलीस चौकीस संपर्क करण्यास सांगितले. यानंतर या प्रवाशाला पैसे परत मिळाले. रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी त्याचा हार घालून सत्कार करत कौतुक केलं आहे.