Lucknow-Pune News: लखनौच्या अमौसी विमानतळावर कार्गो पार्सलमध्ये पाच काडतूसं सापडली. याबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघडकीस आलं आहे. पुण्यातील अजीज अहमदच्या घरी ही काडतूसं पाठवण्यात येत असल्याची माहिती आहे. 


ग्वालटोली कानपूरच्या उमर ग्राफिक्सने हे पार्सल बुक केले होते. विमानतळावर पार्सल स्कॅम करण्यात आलं त्यावेळी त्यात काडतूसं असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर लखनौमध्ये हे पार्सल आणि काडतूसं जप्त करण्यात आले होते.. हे पार्सल पुण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आयेशा नगर या ठिकाणी राहणाऱ्या पुण्यातील तरुणाच्या घरी हे पार्सल पाठवण्यात येणार होतं. अजीज अहमद यांच्या पत्त्यावर हे पार्सल पाठवले जात होतं.या प्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सरोजिनी नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 


जुनैद मोहम्मदच्या कटाशी संबंध?
दिल्ली आणि उत्तरप्रदेशात  मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जुनैद मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांचा कट महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने उघडकीला आणला आहे. दिल्ली, यूपीतील तीन प्रमुख लोकांवर हल्ला करण्याचा कट आखल्याप्रकरणी पुण्यातून एटीएसने अतिरेक्यांना अटक केली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर हल्ले करणार होते. नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी या तीन व्यक्तींवर हल्ल्याच्या तयारीत होते. इतकेच नव्हे तर उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रॅलीवर देखील हल्ला करायचा प्लॅन  बनवला होता. हे सगळं सुरु असताना या काडतूसाचा या कटाशी काही संबंध आहे का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


धमकीशी काय संबंध?
मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये (Hotel) फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब (Bomb) ठेवण्यात आल्याचे सांगितले. तरी बॉम्ब निकामी करण्यासाठी 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत असताना पुण्यात काडतूसं येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.