TET Paper Leak Scam : शिक्षक पात्रता परीक्षेतही घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आज आणखी दोन बड्या माशांना अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जीए टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून आणखी काहीजणांना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात इतर परीक्षांमध्येही घोटाळे झाले असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी याचा तपास सुरू केला. 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात डेरे हा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. टीईटीची 15 जुलै 2018 रोजी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाला. त्यावेळी परीक्षा नियंत्रक डेरे होते. तर, परीक्षेचे कंत्राट जीए टेक्नॉलॉजीकडे होते. या परीक्षेतही घोटाळ्याचा पॅटर्न सारखा असल्याचे समोर आले. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपक्षिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा त्यांना गुण दिले जायचे. या आरोपींनी निकालात घोटाळा करताना खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली.
या प्रकरणातील आणखी काही आरोपींना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पुरावेदेखील मिळाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली. आरोपींची गुन्ह्यातील भूमिका नेमकी काय होती, याबाबत सविस्तरपणे कोर्टात माहिती देण्यात येणार आहे. या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेपरफुटी प्रकरणातील दलाल होता संजय सानप
भाजप कार्यकर्ता संजय सानप हा आरोग्य भरतीचा पेपर फोडण्यात सहभागी होता. एवढंच नाही तर त्याने वडझीरे गावातील मंगल कार्यालयात आरोग्य पैसै देणाऱ्या उमेदवारांना बोलाऊन त्यांच्याकडून फोडलेला हा पेपर लिहून घेतला होता. सानप हा प्रशांत बडगीरेच्या अतिशय जवळचा होता. त्यातूनच त्याला 31 ऑक्टोबरला झालेला आरोग्य भरतीचा पेपर आधीच मिळाला होता आणि परिक्षेच्या काही दिवस आधीच त्याने हा पेपर वडझीरे गावातील मंगल कार्यालयांमध्ये हा पेपर लिहून घेतला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- TET Exam Scam Case : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखाला अटक
- Mhada Paper Leak Scam : पेपरफुटी प्रकरणात भाजयुमोचा नेता संजय सानपला अटक
- TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha