पुणे : महापालिकचे आयुक्त सौरभ राव यांनी आज पुणे स्थायी समितीसमोर 2019-20 साठीचे अंदाजपत्रक सादर केले. 6 हजार 85 कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी 215 कोटी रुपयांनी अंदाजपत्रक वाढले आहे. या प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार पुणेकरांच्या डोक्यावरचा करांचा बोजा वाढू शकतो.


2019-20 या आर्थिक वर्षामध्ये नव्याने सर्वसाधारण करामध्ये प्रत्येक टप्प्यास 5.5 टक्के करवाढ सुचवण्यात आली आहे. जललाभ करामध्ये 1.5 टक्के तर जलनिस्सारण करामध्ये 5 टक्के वाढ सुचवण्यात आली आहे. यामुळे 110 कोटींनी उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदा 215 कोटींनी अंदाजपत्रक वाढवण्यात आले आहे. 5 हजार 870 कोटींच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. आयुक्तांनी हे अंदाजपत्रक पालिकेचे उत्पन्न आणि खर्च या वस्तुस्थितीला धरून असल्याचे सांगितले.

21 जानेवारी 2019 पासून आयुक्तांच्या प्रस्तावित अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या बैठका सुरू होणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये अंतिम अंदाजपत्रक सादर केले जाईल.

शिवसृष्टी रखडणार
कोथरुड शिवसृष्टीसाठीच्या भूसंपादनामध्ये अडचणी येत आहेत. ही बाब स्वतः आयुक्तांनीच मान्य केली आहे. त्यामुळे शिवसृष्टी हा पालिकेचा भव्य प्रकल्प रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कचरा प्रक्रियेत स्वयंपूर्ण होणार?
31 डिसेंबर 2019 नंतर कुठलाही कचरा प्रक्रियेशिवाय डम्पिंग ग्राउंडवर टाकला जाणार नाही. कचरा प्रक्रियेत स्वयंपूर्ण होण्यासाठी पालिकेचे प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी सांगितले.