पुणे: पुण्यात स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना काल (शुक्रवारी) चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या शिरूर तालुक्यतील त्याच्या मुळगावी गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल पाचशे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता, तर नराधम गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिक नागरिकांची पोलिसांनी मदत घेतली. त्यानंतर अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत, तर केवळ शहर आणि ग्रामीण पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यातही श्रेय घेण्याविषयी चढाओढ सुरु असल्याचे दिसून येत आहे. यावरती काल (शुक्रवारी) पोलिस आयुक्तांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
नराधम दत्तात्रय गाडेला गुनाट गावातून शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ, 500 पोलिसांचा फौजफाटा, श्वान पथक आणि ड्रोनची मदतीने नराधमास पकडण्यात यश आलं आहे. मात्र, अटकेवरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. केवळ शहर आणि ग्रामीण पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यातही श्रेय घेण्याविषयी चढाओढ सुरु असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गाडेच्या मुसक्या आवळण्यात तब्बल 72 तासांचा keN लागला, अशी चर्चा काल दिवसभर रंगली होती. तर पोलिस आयुक्तांनी देखील आरोपीला पकडण्यासाठी उशिर झाल्याची कबुली दिली आहे.
स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे गाडेने तरुणीवर अत्याचर केला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहर पोलिसांनी त्याची तात्काळ ओळखह पटवली. आणि शोध सुरू केला, तांत्रिक बाबी तपासून त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे गुनाट (ता. शिरूर) गावही शोधले. मात्र, एवढे सर्व करत असताना शिरूरच्या पोलिसांना याबाबत काहीही सांगितलं नाही. स्थानिक पोलिसांना लगेच कळवलं असतं, तर अवघ्या काही तासांतच गाडेला गजाआड करण्यात यश आलं असतं. मात्र, तसं काही झालं नाही. दत्तात्रय गाडेने गावातील काल्याच्या कीर्तनात हजेरी लावली होती, घटनेनंतर तो घरीही गेला होता. ज्यावेळी गुनाट गावात दुपारी शहर पोलिस आल्याचे दिसताच दत्तात्रयने शेताच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर 13 पथकांच्या साहाय्याने सुरू झाला शहर पोलिसांचा तपास, गुन्हे शाखा विभाग, स्वारगेट पोलिस पथक, झोन 2 चे पथक गुनाट गावात तळ ठोकून बसले होते. गावातील काही जणांची धरपकड करून त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली; पण हाती काही लागले नाही. अनेक पथकं, स्थानिकांची मदत याशिवाय गाडेला पकडणं कठीण होतं.
श्वानपथकानं अन् ड्रोननं माग काढला
गावाच्या आजूबाजूला ऊसाचं मोठं शेत आहे. याच ऊस शेतीचा त्याला लपायला फायदा झाला. मंगळवार आणि बुधवारचा दिवस दत्तात्रयचे लोकेशन शोधण्यातच गेलं. गावच्या परिसरात पोलिस असतानाही गाडे फिरत होता अशी चर्चा सुरू झाली आहे. गावातील काही लोकांकडे त्याने खाल्लं, पण शहर पोलिसांना त्याला पकडणं शक्य झालं नाही. गुरुवारी सकाळपासून गावात श्वानपथक आणि ड्रोनद्वारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. श्वानपथकाने गाडेचा माग काढला, पण ऊस शेतात घुसण्याचं धाडस मात्र झालं नाही. काही स्थानिकांनी उसाच्या शेतात जाऊन देखील पाहणी केली.
निवडणुकीत एकावर चाकूही उगारला होता
गावामध्ये राजकीय वरदहस्ताने गाडेने दहशत निर्माण केली होती. तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत एकावर चाकूही उगारला होता. त्याला गावातील लोक वैतागले होते. अशातच स्थानिक पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांकडे मदत मागितली. त्यानंतर गावकरी, आणि पोलिस यांना पकडण्यात यश आलं आहे.
...तर यापूर्वीच झाला असता गजाआड
दत्ता गाडेच्या शोधासाठी शोधमोहिमेसाठी तुकडीही बोलवली होती. मात्र, निवांतपणे शेताच्या बाजूने शोधमोहीम सुरू होती. ड्रोनमध्येही काही दिसून आलं नाही, तसेच सायंकाळ झाल्याने शोधमोहीम थांवबण्यात आली. त्यानंतर स्थानिक आणि ग्रामीण गुन्हे शाखेने स्थानिक लोकांना विश्वासात घेत गाडेला पकडण्यासाठी शोध घेतला. जर ग्रामीण पोलिसांना अगोदर कळवून शोध घेतला असता तर दत्ता गाडे लवकर पकडला गेला असता असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.