Pune News : स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना पुण्यात (Pune) काळे झेंडे दाखवण्यात आले. 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. राज्यपाल आज (2 डिसेंबर) पुण्यात दौऱ्यावर आहे. पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. हे सगळे कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न स्वराज्य संस्थेकडून केला जात आहे. 


राजभवन परिसराला छावणीचं स्वरुप
या ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेही राजभवनाबाहेर जमले आहेत. राज्यपालांना 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक देत इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रवादीने सांगितलं आहे. 


धोतरावर सह्या करुन निषेध
दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सही करुन, घोषणाबाजी करत राज्यपाल कोश्यारींचा निषेध करण्यात आला होता. स्वराज्य संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. धोतरावर सही करुन अनोख्या पद्धतीने राज्यपालांचा निषेध करण्यात आला. 'राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं.


राज्यपाल काय म्हणाले होते?
दीक्षान्त समारंभ सोहळ्यात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, "आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आवडायचे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचे आवडता हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातच ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय," असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असंही कोश्यारी यांनी म्हटलं.