पुणे: राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या जोरदार राड्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आगपाखड केली होती. राजकोट किल्ल्यावर वादाला आम्ही सुरुवात केली नाही, त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले.आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का, असे वक्तव्य करत नारायण राणे यांनी विरोधकांना डिवचले होते. त्यांच्या या वक्तव्याचा गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर आजपर्यंतच्या कारकीर्दीत झालेल्या गंभीर आरोपांची जंत्री काढत त्यांचा इतिहास मांडला. त्या गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नारायण राणे म्हणतात की, तुम्हाला माझा इतिहास माहिती नाही का? होय नारायण राव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथंपासून माहिती आहे, 1990 ला जी कणकवली कधीकाळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणे हे तुम्ही केले. राणे साहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की, 1990 ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात. तुमच्यावर खटला चालवला गेलाय तुमचा इतिहास इतका मोठा आहे की, 2002 ला सत्यजित भिसे चे जे कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोलले होते आणि न्यायालयात खटला चाललाय. 2009 ला राणेजी तुमचे स्वतःचे सखे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता, हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की, मुलुंडचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली. नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की, ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होता हा तुमचा इतिहास मला माहिती आहे, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली.
तुमचा इतिहास हा आहे की, तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल, श्रीधर नाईक असेल अंकुश राणे असतील अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे, तुमचा इतिहास इतका मोठा आहे. नारायण राणे तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही. नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शेवटी ब्रिगेड मध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेला आहे, ही तुमची एकूण पार्श्वभूमी आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
आणखी वाचा