पुणे : माजी खासदार सुरेश कलमाडींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं आजीवन अध्यक्षपद नाकारलं आहे. कालच त्यांची आयओएच्या मानद आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आज आयओएला पत्र लिहून आपण हे पद स्वीकारु शकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रकूल घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागलेले आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी, यांची आयओएच्या मानद आजीव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. काल चेन्नईत झालेल्या आयओएच्या वार्षिक सभेत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींची आयओएमध्ये एखाद्या मानाच्या पदावर निवड केली जाते, याविषयी क्रीडाक्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. आयओएच्या कारभारावरही त्यामुळं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.
मात्र आज कलमाडींनी आयओएला पत्र लिहून दिलेल्या बहुमानासाठी आभारही मानले आहेत. काल कलमाडींची नियुक्ती झाल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कलमाडींच्या नियुक्तीची लगेचच दखल घेत या प्रकरणी अहवाल मागितला होता, तसंच कारवाईचेही संकेतही दिले होते.
सुरेश कलमाडी सध्या 72 वर्षांचे आहेत. कलमाडी यांनी 1996 ते 2011 या कालावधीत भारतीय ऑलिम्पिक संघटना अर्थात आयओएचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचार समोर आला. त्यानंतर कलमाडींना आयओएचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. कलमाडींना या प्रकरणी अटक झाली होती आणि दहा महिने तुरुंगात काढल्यावर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
कलमाडी हे 2000 ते 2013 या कालावधीत आशियाई अॅथलेटिक्स संघटनेचेही अध्यक्ष होते. या संघटनेनं त्यांना गेल्या वर्षीच मानद अध्यक्षपद दिलं होतं.