पुणे: कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना सध्या चांगलीच गाजत आहे. दररोज याप्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप असलेला मुलगा हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या सरकारी यंत्रणेशी असलेल्या लागेबांध्यांमुळे त्यांच्या मुलावर कठोर कारवाई होऊ शकली नाही, असा आरोप आहे. अशातच आता अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendrakumar Agrawal) यांचेही अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी पूर्वी झालेल्या एका वादात अजय भोसले यांना ठार मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर अजय भोसले यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना अग्रवाल कुटुंबावर आगपाखड केली.


सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते. या सगळ्याचे पुरावे असूनही सुरेशकुमार अग्रवाल यांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार जोरात असल्याने ते जातील तिकडे कायदा विकत घेतात. संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल आहे. कुटुंबातील सर्व लोकांवर दोन-दोन गुन्हे दाखल आहेत. आतादेखील अपघात प्रकरणानंतर आपण पैशांच्या जोरावर आपण सगळं काही विकत घेऊ, असे त्यांना वाटते. ती मोठी लोकं आहेत, त्यांना कायदा-सुव्यवस्थेची भीती नाही, असे अजय भोसले यांनी सांगितले.



अजय भोसलेंवर निवडणुकीच्या प्रचारावेळी गोळी झाडली, 2009 मध्ये नेमकं काय घडलं होतं?


मी 2009 साली शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकीच्या निवडणुकीला उभा होतो. त्यावेळी माझे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे बंधू राम अग्रवाल यांच्याशी संबंध होते. तेव्हा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि राम अग्रवाल यांच्यात 1200 कोटींच्या संपत्तीवरुन वाद सुरु होता. तेव्हा मला धमकीसाठी सतत छोटा राजनचे फोन यायचे. राम अग्रवाल हे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देत नव्हते. यामध्ये मी राम अग्रवाल यांना पाठिंबा देतो, असे सुरेंद्रकुमार अग्रवाल याने छोटा राजनाला सांगितले. ते मला मारण्याची सुपारी देण्यासाठी बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते. 


माझा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असताना पुण्यातील जर्मन बेकरीजवळ छोटा राजनच्या शुटर्सनी माझ्यावर पहिला राऊंड फायर केला. मात्र, त्यांचा नेम चुकला. त्यानंतर आम्ही दोन किलोमीटरपर्यंत गुंडांचा पाठलाग केला. त्यावेळी त्या गुंडांनी दुसरी गोळी झाडली, ती गाडीच्या काचेला लागून माझ्या मित्राच्या छातीत शिरली. आम्ही त्याला घेऊन रुग्णालयात गेलो. एक वर्षांनी आरोपी पकडले गेले तेव्हा त्यांनी कबुली दिली की, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिली होती. हे काम आम्हाला सोपवण्यात आले. छोटा राजनला अटक करुन भारतात आणल्यानंतर त्याच्याविरुद्धच्या सगळ्या केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. तेव्हा माझ्यावरील गोळीबारप्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली पाहिजे होती. मात्र, अजूनही त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देऊन हे प्रकरण रफादफा करायचे आहे, असे अजय भोसले यांनी म्हटले. 


आणखी वाचा


तुमची व्यवस्था गरिबांच्या लेकरांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पिझ्झा-बर्गर खायला घालते; अनिल देशमुखांचा फडणवीसांवर हल्लाबोल