मुंबई: पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांच्या (Pune Police) या कार्यपद्धतीमुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.


देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबांच्या घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले. दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी). देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?, असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.


अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी रेकॉर्ड


पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या विशाल अग्रवालच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे.  विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी 2009 साली शिवसेना नेते अजय भोसले यांच्या हत्येचा सुपारी छोटा राजन टोळीला दिली होती .  अजय भोसले 2009 साली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतून निवडणूकीला उभे असताना प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.  या अपघातामधून अजय भोसले बचावले. मात्र, त्यानंतर गुन्हा दाखल असुनही सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती. हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आल्याने आता सुरेंद्रकुमार अग्रवाल गोत्यात येणार का, हे पाहावे लागेल.






देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?


पुण्यातील अपघातानंतर जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सुत्रे हाती घेतली होती. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलिसांनी आपले सर्व काम व्यवस्थित पार पाडल्याचे सांगितले. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य बालहक्क न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु,त्यानंतर बालहक्क न्यायालयाने दिलेला निर्णय पोलिसांसाठी धक्कादायक होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. हे नृशंस कृत्य आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही हे पालकांनी आपल्या मुलांना सांगावं, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 


आणखी वाचा




माझा नातू अभ्यासात लक्ष देईल अन् वाईट संगतीपासून दूर राहील; आजोबांच्या गॅरंटीनंतर न्या. धनवडेंचा बिल्डरपुत्राला जामीन