Incubator  : लहान मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवून जीवदान देण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील अथवा पाहिल्या असतील. अंडी उबवण केंद्रात म्हणजेच इन्क्युबेटरमध्ये कोंबडीच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उबवून पिलांचा जन्म होतोही आपल्याला माहीत आहे. पण, अशाच अंडी उबवण केंद्रात पहिल्यांदाच लांडोरीच्या अंड्यांपासून मोरांच्या पिल्लांचा जन्म  झालाय. होय, पुण्यात ही घटना घडली आहे. देशातील अशाप्रकारची घडलेली ही पहिलीच घटना असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यातील  पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात ही घटना घडली आहे.


पिंगळी गावातील सुरेश शिंदे या शेतकऱ्याला शेतातील बांधावर लांडोरीची अंडी सापडली. शिंदे यांनी ही अंडी पिंगोरीतील इला फाऊंडेशनकडे आणून दिली. त्यानंतर या अंड्यांना इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं. आणि काही दिवसांनी या अंड्यातून मोराची चार गुटगुटीत अशी पिल्ले बाहेर आली. माणसांच्या हाती एकदा अंडी लागली तर लांडोर देखील त्यांना सांभाळत नाही आणि ती अंडी नष्ट करते. त्यामुळे या पिल्लांना जीवदान मिळाल्याचं बोललं जातेय. महाराष्ट्र वनविभाग आणि इला फाउंडेशनच्या वतीने पिंगोरी गावात ‘इला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’ मध्ये इन्क्युबेटर सेंटर चालवलं जातं. शिंदे यांनी अंडी आणून दिल्यानंतर इला फाउंडेशन यांनी जबाबदारीनं आपलं काम बजावलं. या पिल्लांची इला फाउंडेशनने काळजी घेतली असून, तिथेच ती वाढत आहेत. पण कृत्रिम अंडी उबवण केंद्रात मोरांना जन्म देण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती या केंद्राने दिली आहे.


खरंतर लांडोरीच्या अंड्यांना योग्य तापमान गरजेचं असतं. अन्यथा ती अंडी निकामी होतात. म्हणून ही अंडी उबवण्यासाठी इला फाऊंडेशनने एका तासात इन्क्युबेटर तयार केले. त्यात ही अंडी ठेवली. लांडोर या अंड्यांना सतत हलवत असते. त्यामुळे अंडी हलवण्याचं काम सतत करावं लागत होतं. त्यानंतर सोळा दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर या अंड्यातून सुदृढ अशी पिल्लं बाहेर आली.  इला फाउंडेशनद्वारे या पिल्लांची काळजी घेतली जात आहे. या फाउंडेशनच्या आवारातच ही पिल्लं वाढत आहेत. खरं तर एकदा का अंड्याना माणसांचा हात लागला की लांडोर देखील त्यांना सांभाळत नाही.. ती अंडी नष्ट करून टाकते.. परंतु या अनोख्या प्रयोगाद्वारे त्या पिल्लांना जीवदान मिळालं आहे. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live