Bhima Koregaon 1 January Preparation : भीमा कोरेगावमध्ये (Koregaon Bhima) शौर्यदिनासाठी मोठ्या संख्येने अनुयायी अभिमानदनासाठी येत असतात. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या  हद्दीत 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पासून 2 जानेवारी 2023रोजी मध्यरात्रीपर्यंत 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. 


अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई


त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असणार आहे. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 



पोलिसांकडूनही आवाहन...


विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. पोलीस विभागाच्यावतीने उत्तम पद्धतीने बंदोबस्त करण्यात येणार असून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले, असं आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी केलं आहे.


अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचा विचार करता त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्यावतीने औषधे, मास्क या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एकूणच सर्व विभागाच्यावतीने नियोजनाप्रमाणे कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अनुयायांनी शिस्त बाळगुन शौर्यदिन साजरा करावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. 



वाहनतळ ते भीमा कोरेगाव परिसरात मोफत बस


पीएमपीएमएलकडूनही जादा (pmpml) बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला 370 अधिक बसेसचं नियोजन करण्यात आहे. त्यामुळे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींचा प्रवास सोपा होणार आहे.
वाहनतळ आणि परिसरात फिरण्यासाठी 280 मोफत बस आणि पुण्यातून आठ स्थानकावरुन तिकीट असलेल्या 90 बस सोडल्या जाणार आहे.  कोरेगाव भीमा अंतर्गत परिसरात फिरण्यासाठी पीएमपीकडून 280 बसचं नियोजन केलं आहे. 31 डिसेंबरला सायंकाळी नऊ ते 1 जानेवारीला सकाळी सहा वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान परिसरातून 140 बस सोडण्यात येणार आहेत. भीमा कोरेगावपर्यंत 115 बस आणि वडू फाटा ते वढूपर्यंत 25 बस अशा एकूण 280 मोफत बसचं नियोजन करण्यात आले आहे.