पिंपरी चिंचवड : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सर्व कामकाज ठप्प आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसंच केंद्र सरकार लॉकडाऊनबाबतची जबाबदारी राज्यांवर देण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज औंध ते काळेवाडी साई चौक इथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. या पुलाच्या उद्घाटनानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.


राज्य सरकार पॅकेज जाहीर करणार
राज्यांतील जनतेसाठी सरकारने पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पॅकेज जाहीर करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. ते म्हणाले की, "गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळात निर्णय होणार आहे. मध्यंतरी 21 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पाहायला मिळाले. गरीब जनतेला ही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहे."


लॉकडाऊनची जबाबदारी राज्यांवर देण्याची शक्यता
देशातील चौथा लॉकडाऊन संपण्यासाठी दोन दिवस उरले आहेत. शिवाय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्याबाबत अजित पवार म्हणाले की, लॉकडाऊनबद्दल भारत सरकार काय निर्णय घेतंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतीलच, पण माझ्या अंदाजाने वेगवेगळ्या राज्यांवर ते जबाबदारी देण्याची शक्यता आहे.


एकजुटीने कोरोनाचा सामना करायला हवा
गेल्या काही दिवसांपासून पॅकेजवरुन किंवा परराज्यातील मजुरांना आपापल्या गावी परत जाण्यासाठी ट्रेनच्या उपलब्धतेवरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळालं. परंतु कोरोनासारख्या जागतिक संकटाचा एकजुटीने सामना केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले. "केंद्राने असो, राज्याने असो की स्थानिक प्रशासनाने असो यांनी एकमेकांवर ढकलाढकली करण्यापेक्षा हे जगावरचे संकट आहे, हे लक्षात ठेऊन आपला भारत एकजुटीने याचा सामना करतोय असाच संदेश समाजात जायला हवा," असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


"केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या पातळीवर कोरोना रोखण्याचे प्रयत्न करत आहे. शहरी भागातून स्थलांतर झाल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र खबरदारी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही," असंही पवार म्हणाले.


Ajit Pawar on Package | राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार : अजित पवार


कोरोना संकट नजरेसमोर ठेवूनच आषाढी वारीबाबत निर्णय घेणार
आषाढी वारी सोहळा हा भावनेचा प्रश्न आहे. अनेक वर्षाचा हा इतिहास आहे. वारकऱ्यांच्या भावना ही जपल्या जातील, पण कोरोनाच्या संकटाला नजरेसमोर ठेऊनच हा निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आषाढी वारी कशी पार पाडायची हे ठरवण्यासाठी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता पुण्यातील कौन्सिल हॉलमधे होणाऱ्या बैठकीला आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानचे विश्वस्त त्याचबरोबर पंढरपूर मंदिर समितीचे विश्वस्त हजर असतील. त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पुणे ग्रामीणचे पोलिस आयुक्त उपस्थित असणार आहेत. वारकऱ्यांच्या काही मोजक्या प्रतिनिधींसह यावर्षीची आषाढी वारी पार पाडावी असा वारकऱ्यांमध्ये मतप्रवाह आहे.


Ashadhi Wari | भावनेचा प्रश्न आहे,पण कोरोना संकटाची नोंद घेऊन आषाढी वारीबाबत निर्णय घेणार: अजित पवार