मुंबई/पिंपरी : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले. पैसे घेऊनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक असुरक्षित आहे, आणखी किती जीव घेणार, असा जाब विचारताना सिंधुताईंचा उद्रेक झाला.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्या डोळ्यादेखतच भीषण अपघात होता होता टळला. त्या गाडीमध्ये लहान मुलांसह वीसच्या जवळपास महिलांचा समावेश होता. हा प्रसंग प्रत्यक्ष घडताना पाहून सिंधुताई उद्विग्न झाल्या आणि त्यांनी न राहवून टोलनाक्यावरच संताप व्यक्त केला.

उर्से टोलनाक्यावर थांबून 'आणखी किती लोकांचे तुम्ही जीव घेणार?' अशा शब्दात सिंधुताईंनी जाब विचारला. पुढील 8 दिवसात प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर हजारो नागरिकांना महामार्गावर उतरवून आंदोलन छेडण्याचाही इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु असतानाच ही घटना घडली.

चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या विनोद सातव यांनी टोलनाक्यावर गर्दी पाहून चौकशी केली. त्यावेळी सिंधूताईंचा झालेला संताप त्यांनी पाहिला. त्यानंतर सातव यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करुन 'एबीपी माझा'ला यासंदर्भात माहिती दिली.

काय म्हणाल्या सिंधूताई?

(टोलनाक्यावरील संभाषण)

आत्ता माझ्यासमोर वीस लोक मेले असते. एक तरी लाईन सोडा लहान गाड्यांसाठी. लक्ष द्या नाही.. आठ दिवसांची मुदत... जर आठ दिवसात या मोठ्या गाड्या बंद झाल्या नाहीत, तर हजार लोकं घेऊन बसेन मी. कोणी सांगितलं तुम्हाला जीव घ्यायला? मग हे कधी बदलणार? जिथं लावायचं तिथं फोन लावा.

(फोनवरील संभाषण)

कोणी अधिकार दिला तुम्हाला माणसं मारण्याचा? टोल भरतो ना. मोठमोठी माणसं या एक्सप्रेस वे वर जखमी झाले, मृत्युमुखी पडले. त्यांचे संसार उघड्यावर पडले. कुठल्याही लेकराची माय मरु नये, आणि कुठल्याही मायेचं लेकरु जाऊ नये. वीस माणसं आत्ता मेली असती. तुम्ही काय करता?

खोपोली ते लोणावळा मार्गावर तुमच्या कोणाच्या गाड्या का नसतात? सगळ्या मोठ्या गाड्यांनी वाहतूक अडवली असते. एकही गाडी पुढे सरकू शकत नाही. ज्या गाड्या मधून रस्ता काढतात, त्या कधीही मरु शकतात. काय करता तु्म्ही?

तुम्हाला मी आठ दिवसांची मुदत देते. जर आठ दिवसात हे काम झालं नाही, तर मी हजारो लोक घेऊन इथे बसेन. कुणाला कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. काय लावलंय हे? हॅलो! पहिलं हे बंद करा.

(सिंधुताईंना शांत करण्याचा प्रयत्न झाला) शांत कसं राहायचं? बरोबर नाही हे. लहान लहान लेकरं आणि बाया भरलेली ती गाडी...

दीड महिन्यांपूर्वी अभिनेता सुबोध भावे यानेही व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई-पुणे प्रवासादरम्यान आलेला 'सुखद' अनुभव उपहासातून मांडला होता.

आपण नाही सुधारणार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत सुबोधची खंत


'मी आजच प्रवास केला. मला आलेला अनुभव विलक्षण होता. काही मोटरसायकल आमच्याशी स्पर्धा करत होत्या. याच रस्त्यावर आतापर्यंत अनेक जणांनी अपघातात जीव गमावले. आपण टोल भरतो आणि स्वतःच्या जीवाशी खेळतो. यात सुधारण्याचे काही चान्सच नाहीत. जय हिंद जय महाराष्ट्र!' असं सुबोधने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

पाहा सिंधूताईंच्या उद्रेकाचा व्हि़डिओ :