Pune: प्रसिद्ध समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत, असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Sindhutai Sapkal) फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि नंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15000 रुपये फोन पे ने किंवा 'गुगल पे ' ने मागवले जातात. हा सगळा प्रकार काही जणांनी सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवलाय. यानंतर ममता सपकाळ यांनीही आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे तुमच्याकडे मुलगी आहे का ? अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकारची शहानिशा केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला .त्यानंतर त्यांनी सासवड पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून लवकरच पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देणार असल्याचं सांगितलंय . (Pune Fraud)
नेमकं प्रकरण काय?
ममता सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात काही व्यक्ती फोन करून ‘सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलींसाठी लग्नाची व्यवस्था करतोय’ असे सांगत होते. त्यानंतर इच्छुकांकडून रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली ₹15,000 रुपये फोन पे किंवा गुगल पेद्वारे मागवले जात होते. काहींनी अशा प्रकारे पैसे देखील भरले आहेत. या प्रकाराची माहिती काही जागरूक नागरिकांनी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर त्यांनी स्वतः फोन करून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. "आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे, तुमच्याकडे आहे का?" अशा आशयाने विचारणा करत त्यांनी संबंधित व्यक्तीशी संवाद साधला. त्यावेळी देखील त्यांच्याकडून ₹15,000 रुपये मागण्यात आले, तसेच संपूर्ण वैयक्तिक माहिती देखील विचारण्यात आली.
या फसवणुकीसंबंधी ममता सपकाळ यांनी सासवड पोलिसांना तक्रारपत्र दिलं असून, या प्रकारांची सखोल चौकशी व्हावी आणि माईंच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच, ममता सपकाळ यांनी काही स्क्रिनशॉट्स आणि कॉल रेकॉर्डिंगचे पुरावेही पोलिसांना सादर केले आहेत. “सिंधुताई सपकाळ माईंच्या नावाचा गैरवापर करून जर कोणी फसवणूक करत असेल, तर ती बदनामी आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशाराही ममता सपकाळ यांनी दिलाय.
हेही वाचा